दुचाकीस्वाराला हटकले.... त्यांने चक्क डोकेच फोडले

Foto
पावती देताना थुंकल्याचा जाब विचारताच बहाद्दराने वाहतुक पोलिसाच्या डोक्यात घाव घातल्याची घटना आज दुपारी बीड बायपास रस्त्यावरील गोदावरी टी पाईंटजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष विश्वनाथ देवरे (४२, रा. आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल) आणि किशोर गोपीनाथ भागवत (२५, रा. नवनाथनगर, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे.
बीड बायपास रस्त्यावरील गोदावरी टी पाईंट येथून दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दुचाकीवर (एमएच-२०-ईएम ८९४९) सुभाष देवरे आणि किशोर भागवत राँगसाईडने जात होते. कर्तव्य बजावणारे वाहतुक शाखेचे पोलिस नाईक राजू गरीबदास कोतवाल (५१), निलेश वैजीनाथ कुल्ली आणि होमगार्ड अजय विजयराव खटके यांनी दोघांना थांबवले. यावेळी दुचाकीस्वार देवरेला वाहन परवाना मागितला. तेव्हा त्याने वाहनाची कागदपत्रे सोबत नाहीत असे सांगितले. त्यामुळे त्यांना ई-चलन मशीनव्दारे दोनशे रुपयांची पेड पावती दिली. त्याचवेळी देवरे दुचाकीवरुन खाली उतरला व  तोंडावरील मास्क काढून थुंकला. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे म्हणताच तो थेट कोतवाल यांच्या अंगावरच थुंकला. त्यावरुन वाद झाल्यावर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भागवतने कोतवाल यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर या दोघांना पोलिसांनी पकडले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.